मनोरुग्ण पुनर्वसनाचे कार्य खरेतर शासन – प्रशासनाचे – एसपी चिंता
निर्माणकार्यास समाजाने पुढे येण्याची गरज

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
मनोरुग्ण पुनर्वसनाचे कार्य खरेतर शासन – प्रशासनाचे आहे. परंतु,कुठल्याही शासकीय आणि व्यक्तिगत निधीशिवाय संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याने या कार्याला लीलया पेलले. समाजात बरेच धनाढ्य आहे परंतु, दानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे.म्हणूनच या मानवीय कार्यासाठी पुढे आलेल्या भूत कुटुंबीयांची यातून सामाजिक जाण लक्षात येते,असे विधान पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले.
शनिवारी बोथबोडण फाट्यावर आयोजित दानपत्र सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.मंचावर मातोश्री कमलादेवी भूत, हरिओम (बाबुजी) भूत, मंजूदेवी भूत,सुरेश राठी,रमेश भूत,निरंजन व सरिता भूत,आशुतोष व शीतल भूत,बळवंत चिंतावार यांच्यासह बोथबोडणचे सरपंच अमोल जयस्वाल उपस्थित होते. आपल्या दानशूर वृत्तीने सर्वपरिचित असलेल्या भूत कुटुंबीयांनी बोथबोडण फाट्यावर ३.५ एकर शेतजमीन खरेदी करून ती शिंदे दाम्पत्याच्या झोळीत मनोरुग्ण सेवेसाठी दान केली आहे. ५ जुलैला याच प्रस्तावित निवारा केंद्रामध्ये दानपत्र सोहळा आयोजित करण्यात आला.याप्रसंगी पुढे बोलताना अधीक्षक चिंता म्हणाले की,शिंदे दाम्पत्याच्या कार्यास शब्दाने व्यक्त करता येत नाही,त्यासाठी शब्द अपुरे पडतील.बेघरांचा सांभाळ करणे म्हणजे एकप्रकारे डॉक्टर आणि आई- वडिलांसमान असणारे कार्य असून ही मंडळी या सेवाकार्यास नेटाने पुढे नेत आहे.
चिमूटभर जागेसाठी वैर पाळणाऱ्या लोकांची समाजात काही कमी नाही. मात्र एखादी जमीन खरेदी करून ती दान देण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि सामाजिक दायित्वाची जाण लागते,ती भूत कुटुंबीयांमध्ये आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटनास मला यायचे आहे असे म्हणत त्यांनी निर्माणकार्यास ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली. सामाजिक जबाबदारीचे भान आईवडिलांच्या संस्काराने आमच्यात रुजविले. मनोरुग्ण सेवाकार्याची समाजाला गरज आहे,हे कार्य मोठे झाले पाहिजे म्हणूनच भूत परिवाराने यासाठी पुढाकार घेतला आहे. मनोरुग्णसेवेतून निरामय झालेली मंडळीच माझी ताकद आणि माझे भांडवल असणार आहे,असे भावोद्गार भूत बाबूजींनी याप्रसंगी काढले. प्रास्ताविकातून प्रा.घनशाम दरणे यांनी नंददीपचा एकूण प्रवास विशद केला तर संचलन पत्रकार तथा नंददीपचे संचालकीय मंडळ सदस्य नितीन पखाले यांनी केले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भूमिप्रदान शिळेचे अनावरण तसेच वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
स्वयंसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
पुनर्वसन प्रक्रियेत देशोदेशी तसेच राज्याचा धांडोळा घेत मनोरुग्णांचे (प्रभुजी) त्यांच्या कुटुंबीयांकडे पुनर्वसन करणारे नंददीपचे स्वयंसेवक निशांत सायरे व त्यांची चमू,केंद्राचा लेखाजोखा तयार करणारे निवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार,जमीन हस्तांतरण प्रक्रियेत मदत करणारे निवृत्त नगररचना अधिकारी छडानन राजुरकर, डॉ.प्रकाश नंदुरकर,डॉ.कविता करोडदेव,संकल्प फाउंडेशनचे प्रलय टिप्रमवार यांच्यासह वृद्धांचा सांभाळ करणारे शेषराव डोंगरे व खुशाल नागपुरे यांच्यासह बोथबोडणचे सरपंच अमोल जयस्वाल यांना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाला शहरातील सामाजिक चळवळीतील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.