हजारोंच्या उपस्थितीत मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वाला प्रारंभ
चिंतामणी बाजार समितीचा परिसर दुमदुमला

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
कथापर्वाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसे भाविकांचे लोंढे कार्यक्रमस्थळी पोहोचत होते. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी मांदियाळी होत होती. सर्वांना कथा ऐकण्याची उत्कंठा लागली होती. टाळमृदंगाच्या गजरात रामकथेची पोथी मंचावर आणली गेली. काही वेळातच कथापर्वाला सुरुवात झाली. निमित्त होते, प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वाचे.
यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील भोयर बायपासजवळील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त अशा मंडपात १४ सप्टेंबरपर्यंत सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजतापर्यंत कथापर्व आयोजित करण्यात आले आहे. यासाठी देशभरातील भक्तगण दाखल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी कथापर्वाला प्रारंभ झाला.
कथापर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराने चिंतामणी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरून टाळमृदुंगाच्या गजरात रामकथेची पोथी डोक्यावर ठेवून शोभायात्रेद्वारे मुख्य मंचावर आणली. शोभायात्रा समितीच्या प्रमुख सीमा दर्डा यांनी नेतृत्व केले. शोभायात्रेत महिलांसह बालगोपाळ सहभागी झाले होते.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जैन आचार्य पूज्य डॉ. लोकेश मुनीजी, अखिल भारतीय चतु:संप्रदायचे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष कीर्ती गांधी, सचिव किशोर दर्डा, सुनित कोठारी, पूर्वा कोठारी, लव दर्डा, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, प्रवीण चंद्रकोटक (अहमदाबाद), आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सीए जयेंद्रभाई शहा, जीजेईपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे कोषाध्यक्ष किरीटभाई भन्साळी, युनिकेम लॅबोरिटरीज लि.चे चेअरमन प्रकाश मोदी, प्रसिद्ध उद्योगपती संजयभाई ठक्कर, अमेरिकेहून आलेले मनमोहन पटेल (कॅलिफोर्निया), एलोरा येथील बापूंच्या कथेचे यजमान राहिलेले राजेशभाई दोशी (मुंबई), रेमंडचे समूह सीएफओ अमित अग्रवाल, विकास शहा (अहमदाबाद) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जैन आचार्य पूज्य डाॅ. लोकेश मुनीजी म्हणाले, मोरारी बापू यांच्या रामकथेच्या माध्यमातून कोटी कोटी नागरिकांमध्ये नैतिकता, चारित्र्य आणि मूल्यांची प्रतिष्ठापणा केली जाते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याविषयी सांगितले. दिल्ली येथे १७ ते २५ जानेवारी या कालावधीत नऊ दिवसांची रामकथा आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
रामकथा पर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी परमपूज्य मोरारी बापू यांचे स्वागत केले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, मोरारी बापू यांचे यवतमाळच्या मातीला पाय लागले. रामकथा यवतमाळात व्हावी, अशी माझी आई वीणादेवी आणि पत्नी ज्योत्स्ना यांची इच्छा होती. त्यामुळे या आयोजनासाठी मी व्याकूळ होतो, असे डाॅ. दर्डा म्हणाले.
रामराज्यासाठी पाच पिढ्या घालाव्या लागतात
पहिल्या दिवशी आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांनी मातृ-पितृपक्षावर रामकथा पर्वाला प्रारंभ केला. जो आई-वडिलांच्या वचनांची पूर्तता करतो तोच खरा पुत्र, असे ते म्हणाले. भारतीय परंपरेतील चार मतांना सोबत घेतले तर रामराज्य निश्चित येते. पण रामराज्य आणणे सोपे नाही. त्यासाठी पाच पिढ्या घालाव्या लागतात. साधूमत आणि वेदमताच्या मध्ये लोकमत आणि राजनिती राहिली तर रामराज्याची संकल्पना प्रत्ययास येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हनुमानगाथाही सांगितली. हनुमान चालिसा पठनामुळे श्रद्धा आणि बुद्धीही वाढेल, असे ते म्हणाले.