गुरू म्हणजे आत्म्याचा दीप मोरारी बापू : रामकथा पर्वात गुरू-शिष्य नात्यावर मार्गदर्शन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
आपल्याला नम्र करणे, आपला अहंकार तोडणे, वैराग्य आणि विश्रांती देणे, विकास घडविणे आणि विश्वास वाढविणे हे केवळ गुरूमुळे होऊ शकते. त्यामुळेच गुरू म्हणजे आत्म्याचा दीप, असे मोरारी बापू यांनी सांगितले. रामकथा पर्वाच्या पाचव्या दिवशी त्यांनी गुरू आणि शिष्याचे नाते यावर मार्गदर्शन केले.
येथील दारव्हा मार्गावरील चिंतामणी बाजार समितीच्या प्रांगणात डाॅ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने प्रसिद्ध आध्यात्मिक संत तथा कथाकार मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वाचे आयोजन १४ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मोरारी बापू म्हणाले, जो गुरूच्या मौनाला समजतो तोच खरा शिष्य. रामचरित मानसमधील राम-भरत भेट, सीता-राम मीलन आणि शिवधनुष्य भंजन हे केवळ साहित्य नाही तर आत्म्याला हलवून टाकणारी प्रतिकृती असल्याचे त्यांनी सांगितले. गुरू सदैव विचाराने, दृष्टीकोनाने आणि आचरणाने युवा असावा, असे ते म्हणाले.
आज माझे वय ८१ आहे. मला वाटते की व्यासपीठावर कथा सांगत-सांगतच मला निवृत्ती मिळावी. कारण आध्यात्मामध्ये निवृत्ती नसते. इथे प्रवृत्तीच निवृत्तीमध्ये बदलते. भगवंताचं कार्य करीत राहणे हीच प्रवृत्ती आहे आणि निवृत्तीही असल्याचे मोरारी बापू म्हणाले.
तरच जीवन यशस्वी आणि समाज समृद्ध होईल
याप्रसंगी कथापर्वाचे यजमान डाॅ. विजय दर्डा म्हणाले, रामकथेत बापूंनी कठीण परिस्थितीतही आपला सिद्धांत आणि संस्कार सोडू नका, असे सांगितले. रामकथा आपल्याला शक्तीचा उपयोग इतरांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे तर दुर्बळांच्या रक्षणासाठी करायचा आहे, हे शिकविते. युवकांनी रामायणातून प्रेरणा घेऊन जीवनात शिस्त, सत्य आणि समर्पण आणावे तरच जीवन यशस्वी आणि समाज समृद्ध होईल.
मान्यवरांची उपस्थिती
अखिल भारतीय चतु:संप्रदायाचे अध्यक्ष महामंडलेश्वर डाॅ. संगीतकृष्ण सावरिया बाबा, पद्मश्री डाॅ. विकास महात्मे, डॉ. सुनीता महात्मे (नागपूर), राजेश जैन (जळगाव-मुंबई), अजंता फार्माचे सीएमडी मधुसूदन अग्रवाल (मुंबई), ‘लाेकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, प्रा. नितीन वडघाम (राजकाेट), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख सुनील देशपांडे.