आयकर विभाग व दीनदयालच्या वतीने स्वयंसेवी व धर्मदाय संस्थांसाठीची कार्यशाळा संपन्न

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स, नागपुर आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने यवतमाळलगतच्या दीनदयाल प्रबोधिनीत स्वयंसेवी व धर्मदाय संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर या कार्यशाळेचे उद्घाटन यवतमाळ येथील सहायक धर्मादाय आयुक्त एम. एस. बनचरे यांनी केले. आपल्या उद्बोधनात त्यांनी दीनदयाल संस्थेच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर ॲड् राजेंद्र गटलेवार यांनी ‘बदल अर्जाचे (Change Report) महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. भोजनानंतरच्या सत्रात आयकर विभाग कार्यशाळेचे प्रास्ताविक यवतमाळ येथील ज्येष्ठ सनदी लेखापाल प्रकाश चोपडा यांनी केले. त्यानंतर आयकर निरीक्षक मारुती गोंडेकर यांनी आयकर विभागाच्या स्वयंसेवी संस्थांसबंधी तरतुदींवर विस्तृत सादरीकरण केले. कार्यशाळेत प्रामुख्याने उपस्थित नागपूर येथील आयकर अधिकारी गौतम कुमार यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. कार्यशाळेला नागपुर येथील आयकर अधिकारी अशोक वाडेकर, आयकर निरीक्षक सरला सेमाळे, यवतमाळ येथील आयकर निरीक्षक पंकज भाटिया, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील राहुल बोदडे, यांचेसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शहरातील सनदी लेखापाल आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यशाळेची विधिवत सुरुवात करण्यात आली. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष धनंजय चौहान आणि सहसचिव चंद्रशेखर बिडवाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यशाळेचे संचालन, पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी केले.