पालकमंत्री संजय राठोड व परिवाराच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये उद्या बंजारा समाजाचा रंगोत्सव

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
पालकमंत्री संजय राठोड व परिवाराच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये आज बंजारा समाजाचा रंगोत्सव
यवतमाळ – बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या होळी उत्सवाला यंदा खास स्वरूप देत, यवतमाळ शहरातील बंजारा समाज बांधव एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड आणि सौ. शीतलताई राठोड यंदा सहपरिवार बंजारा समाजासोबत होळी साजरी करणार आहेत. यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बंजारा होळी उत्सव समिती यवतमाळ शहराच्या वतीने शुक्रवार, १४ मार्च रोजी हा रंगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ६ते ७ प्रत्येक तांड्यात सोयीनुसार होळी पुजन नंतर संत सेवालाल महाराज मैदान, राजीव नगर येथे सकाळी ८:००ते १०:३० परंपरेनुसार रंगांची उधळण, लेंगी नृत्य, बंजारा हास्यरंग कार्यक्रम आणि स्नेह-मिलन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या संपूर्ण कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड हे सहपरिवार सहभागी होणार आहेत.
हा केवळ रंगांचा कार्यक्रम नसून समाजातील एकोपा, सांस्कृतिक वारशाचे जतन, आणि परंपरांचे संवर्धन याचे प्रतीक आहे. शहरातील सर्व तांड्यांचे प्रमुख, प्रतिष्ठित मंडळी आणि हजारो बंजारा बांधव या उत्सवात सहभागी होणार आहेत. बंजारा होळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे समाजाच्या एकात्मतेला प्रोत्साहन देणे आणि भावी पिढीपर्यंत आपल्या परंपरा पोहोचवणे आहे, असे प्रा. राजेश चव्हाण यांनी सांगितले. रंगांचा हा उत्सव बंजारा समाजाच्या चिरंतन संस्कृतीला उजाळा देण्यासह एकत्र येऊन उत्साहाने साजरा करण्याचा एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. त्यामुळे बंजारा समाज बांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.