शाही संदल ठाणेदारांच्या डोक्यावर आर्णीत तब्बल ९६ वर्षाची परंपरा आजही कायम

आर्णी कॉटन सिटी न्यूज
ता ५ येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबा कम्बलपोष यांचा मानाचा शाही संदल ठाणेदार केशव ठाकरे यांच्या डोक्यावर घेऊन काढण्यात आला. ५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ऊर्स महोत्सवात दूर दूर वरून येणाऱ्या भाविकांनी हा परिसर फुलून गेलेला आहे. बाबा कम्बलपोष यांचा उर्स ५ फेब्रुवारीला शाही संदलने प्रारंभ झाला. यंदाचा हा ९६ वा ऊर्स भरला आहे. बाबा कम्बलपोष व त्यांचे परमशिष्य किसन उर्फ बच्चू बाबा यांच्या समाधीस्थळावरून शाही संदल निघाला. ठाणेदार यांच्या बंगल्यातील बाबा कम्बलपोष बैठकस्थळी पोहोचवून ठाणेदार यांच्या बंगल्यावर ठाणेदार केशव ठाकरे यांनी हा मानाचा शाही संदल डोक्यावर घेतला. यावेळी सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते. बाबा कम्बलपोष यांचा मानाचा शाही संदल हा सर्वप्रथम ठाणेदार करामत अली यांनी डोक्यावर घेऊन ठाणेदाराच्या डोक्यावरच मानाचा शाही संदल राहील, ही प्रथा आज ९६ व्या वर्षीही आहे. बाबा कम्बलपोष व त्यांचे शिष्य किसन ऊर्फ बच्चू बाबा यांचा ऊर्स १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.