ताज्या घडामोडी

रामकथा पर्वाच्या माध्यमातून संस्कार, मानवता यज्ञाची गंगा वाहणार महंत आचार्य सावरिया बाबा : राष्ट्रसंत मोरारी बापू

रामकथा पर्व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

राष्ट्रसंत श्री मोरारी बापूू यांच्या रामकथा पर्वाचे यवतमाळ येथे ६ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. या रामकथा पर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराने या माध्यमातून पवित्र गंगेलाच यवतमाळमध्ये निमंत्रित केले आहे. राष्ट्रसंत मोरारी बापू यांचे रामकथावाचन हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. जो मनुष्य या संगमामध्ये डुबून ज्ञान ग्रहण करेल, त्याचे जीवन धन्य होणार असल्याने यवतमाळमधील हे कथापर्व म्हणजे एक प्रकारे संस्कार, मानवतावादाचा पवित्र यज्ञ असून ही ज्ञानगंगाच यवतमाळला येत असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय चर्तुसंप्रदायचे अध्यक्ष महंत आचार्य श्री सावरिया बाबा यांनी केले.

येथील दर्डानगरमधील दर्डा मातोश्री सभागृहात राष्ट्रसंत मोरारी बापू रामकथा पर्व जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकथा पर्वाचे यजमान व आयोजन समितीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत मोरारी बापू यांचे रामकथा पर्व आयोजित करण्यासाठी इथल्या अनेकांनी प्रयत्न केले, परंतु अनेकांना ते शक्य झाले नाही. डॉ. विजय दर्डा हे खऱ्या अर्थाने पुण्यवान आहेत. त्यांनी २००३ मध्येही श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करून यवतमाळकरांसाठी पुण्यकर्म केले आणि आता २०२५ मध्येही त्यांनी या भव्य रामकथा प्रवचनाचे आयोजन केले आहे. या पवित्र गंगेच्या ज्ञानयज्ञात डुबकी मारून पवित्र होण्याची संधी त्यांनी दिली आहे. हा यवतमाळसाठी स्वाभिमानाचा, आनंदाचा आणि आत्यंतिक आदराचा क्षण असल्याचे श्री सावरिया बाबा म्हणाले. प्रारंभी यजमान परिवाराच्या वतीने किशोर व सीमा दर्डा दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. मंचावर आमदार बाळासाहेब मांगूळकर, अरुणभाई पोबारू, विजय मुंधडा, डॉ. प्रकाश नंदूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष कीर्ती गांधी यांनी, तर उपस्थितांचे आभार सचिव किशोर दर्डा यांंनी मानले. कार्यक्रमाला यवतमाळच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने हे महापर्व अविस्मरणीय करू या – डॉ. विजय दर्डा

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. एका पवित्र कार्याची सुरुवात पूजेने झाली. श्री मोरारी बापू यांच्या रामकथा पर्व संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज माझ्या हातात कंकण बांधण्यात आले. हे पवित्र बंधन आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि आशीर्वादातून आपण यशस्वी करू, या मातीवर माझी श्रद्धा आहे. हे महापर्व अविस्मरणीय होईल, असा विश्वास रामकथा पर्वाचे यजमान व आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केला. वेगवेगळे धर्म, संप्रदाय असले तरी सगळ्यांचा मानवधर्मावर विश्वास आहे. जोपर्यंत या मानवधर्माची पूजा होत नाही, तोपर्यंत सगळ्या पूजा अपुऱ्या असल्याचे सांगत समाज बदल, परिवर्तनाचे हे कार्य यवतमाळच्या पुण्याईने होत असून ते सर्वांना समाधान आणि आनंद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रामकथा पर्वाबाबत केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील नागरिकांत उत्साह आहे. त्यामुळे आम्हा यवतमाळकरांची जबाबदारी वाढणार असून प्रत्येकाने हे आपल्या घरचे कार्य असल्याचे समजून सहभागी व्हावे. रामकथा पर्व हा कोण्या धर्माचा प्रचार नव्हे तर तो ज्ञानयज्ञ आहे, हे कथापर्व जीवन जगण्याची कला शिकविते. नाते, मित्रत्व जपून मानव धर्म वृद्धिंगत करते, त्यामुळे मनुष्य जातीच्या उन्नती आणि समृद्धीसाठी हा संस्कार यज्ञ यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!