आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा ते मानवसेवेची पंढरी यवतमाळचा बदलता सामाजिक चेहरा आशादायक
विशेष लेख*

*यवतमाळ कॉटन सिटी न्यूज*
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा ही यवतमाळची ओळख. गेल्या २५-३० वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा हा कलंक यवतमाळला चिटकला. देशभरातही यवतमाळची हीच नकारात्मक ओळख आहे. मात्र अलिकडच्या पाच, सात वर्षांत हे चित्र बदलत आहे. हळुहळु शेतकरी आत्महत्येचा जिल्हा हा दुर्दैवी शिक्का पुसल्या जात असून मानवसेवा कार्याची पंढरी म्हणून यवतमाळ जिल्ह्याची नवी आणि सकारात्मक ओळख निर्माण होते आहे.
जिल्ह्यातील तरुणांनी विविध सेवा प्रकल्पांचा आरंभ करून ते यशस्वी करून दाखविले आहेत. उमरी पठार येथील श्री शेषराव डोंगरे यांचे वृद्धाश्रम, आर्णी येथील खुशाल नागपुरे संचालित मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धांना सेवा देत आहे. पुसद, घाटंजी, दारव्हा, बेलोरा (ता. यवतमाळ) येथे नुकतेच नवीन वृद्धाश्रम सुरु झाले आहेत. त्यांच्या उभारणीसाठी अनेक हातांनी आपले योगदान दिले आहे. यवतमाळला शासकीय योजनेतून १९९७-९८ ला सुरु झालेले मातोश्री वृद्धाश्रम सुरु आहेच. तसेच नुकताच श्री. हरीओम भूत(बाबूजी) यांनी स्वखर्चानी चौसाळा येथे उभारलेला आधुनिक सर्व सोईयुक्त वृद्धाश्रम तर आवर्जून बघण्यासारखा आहे.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे ग्रामीण विकास, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, उपजीविका आदी क्षेत्रात असणारे या संस्थेचे काम वाखाणण्याजोगे आहे. बालगृह, शिशुगृहाचे काम वणी परिसरात तर नावाजलेलेच आहे. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहून काम कसे करत राहावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. किशोर मोघे व त्यांची टीम. कोरोना काळात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खूप मोठं कार्य डॉ. मोघे सर व त्यांच्या टीमने केले. दीनदयाळ सेवा संस्थातर्फे पारधी मुलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वसतिगृह प्रकल्प राबविण्यात येतो. पारधी समुदायाला शिक्षणाची परंपरा नाही. अशा परिस्थितीत शेकडो वंचित मुलांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणायचे कार्य मोलाचं ठरत आहे. तसेच तेजस्विनी छात्रावासातर्फे पारधी व शेतकरी आत्महत्या झालेल्या परिवारातील मुलींसाठी वसतिगृह सुद्धा सुरू आहे. इशू माळवी व पपीता माळवी या फासेपारधी समाजातील जोडप्याद्वारे पारधी मुलींसाठी ‘सावित्रीच्या लेकी’ या नावाने वसतीगृह नावारूपास येते आहे. नुकताच सौ. पपीता माळवी यांना ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या प्रतिष्ठित “तरुण तेजांकित” पुरस्कारानेसुद्धा गौरविण्यात आले. भटक्या धनगर आणि इतरही वंचित मुला-मुलींमध्ये शिक्षण गोडी निर्माण व्हावी यासाठी ओवी फाऊंडेशन ग्रामीण परिसरात करीत असलेले कार्य पुढील पिढी घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते आहे. प्रणाली जाधव व धम्मानंद यांनी टाटा इन्स्टिट्यूटसारख्या प्रतिष्ठित संस्थेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लाखो रुपयांच्या नोकरीच्या मागे न लागता यवतमाळ सारख्या ग्रामीण परिसरात वंचित परिवारातील मुले शिक्षण क्षेत्रात तग धरून राहण्यासाठीचे पवित्र काम हाती घेतले आहे.
‘सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या’ माध्यमातून दिव्यांग, अंध मुलं – मुलींचा निवासी प्रकल्प श्री. प्रशांत बनगीनवार यांनी समर्थपणे उभारला. अंध मुलांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचं नाविन्यपूर्ण कार्य सेवा समर्पणद्वारे सुरू आहे. अंध मुलं, मुलींचा तयार झालेला ऑर्केस्ट्रा विशेष नावारुपाला येतो आहे. तसेच डॉ. प्रकाश नांदुरकर सरांद्वारे जे विविध सेवा कार्य चालत आहेत, तो तर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. यवतमाळ येथे त्यांनी उभे केलेले मोफत महिला व बाल रुग्णालय हे तर राज्यातील दुर्मीळ उदाहरण आहे. आजच्या काळात पूर्ण मोफत रुग्णालय असू शकतं, ही खरंच अविश्वसनीय बाब आहे. डॉ. नंदुरकर सर ‘संत चिकित्सा मंडळा’ द्वारे गेल्या २७ वर्षांपासून मेडिकल कॉलेजमध्ये एक वेळ अन्नदान सेवा अविरत चालवितात. दसरा, दिवाळीला सुद्धा यात खंड नाही, हा सुद्धा एखाद्या सेवेचा रेकॉर्ड असू शकतो. तसेच त्यांनी सुरु केलेले सर्वधर्मीय सामूहिक विवाह देशभरात प्रसिद्ध झालेत. आज पावेतो २२०० विवाह या मेळाव्याव्दारे पार पडलेत. डॉ. प्रकाश सर सामाजिक सेवेचे भीष्मपितामहच जणू! सोबतच प्रयास यवतमाळचे पर्यावरण विषयक कार्य आणि त्यातून उभा झालेला प्रयास वन प्रकल्प संपूर्ण राज्यातील एक पथदर्शी प्रकल्प आहे. यासाठी संपूर्ण यवतमाळकरांनी आर्थिक योगदान दिले आहे. संकल्प फाऊंडेशनचे अन्नदान कार्य, शिव भावे जीव सेवा ही मृत व्यक्तीच्या घरी जाऊन दिली जाणारी अन्नसेवा हे संकल्पचे मोठे वैशिष्ट्य होय. ओलावा, बी काइंडचे पशु – पक्षी सेवा कार्य पण वाखाणण्यासारखं आहे.
या सर्व मानव सेवेतील एक अत्यंत उल्लेखनीय कार्य म्हणजे संदीप शिंदे यांनी मनोरुग्णासाठी उभारलेले नंददीप फाउंडेशनचे सेवाकार्य होय. संदीप शिंदे, सौ.नंदिनी शिंदे आणि नंददीपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेवाकार्याच्या माध्यमातून एक अनोखे उदाहरण संपूर्ण राज्याला घालून दिले आहे. नंददीपने देशभरातच नाही तर नेपाळ, बांगला देशामधून आलेल्या मनोरुग्णांवर उपचार करून घरी पोहचून दिले. देशभरात आज नंदादीपचे कार्य पोहचत आहे. फक्त पाच वर्षातच प्रचंड मोठं कार्य यशस्वी करून नावारूपास आणणे अशक्यप्राय; पण ते शक्य करून दाखविले ते संदीप शिंदे याने. नंदादीप फाऊंडेशन संचालित मनोरूग्ण निवारा केंद्राचा तिसरा वर्धापन नुकताच झाला. नंदादीप फाऊंडेशन व सेवा समर्पण द्वारा सुरू झालेले हे कार्य संदीप व नंदिनी शिंदे यांनी मोठ्या कष्टाने उभे केले. त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे व लवकरच देशभरात मनोरुग्ण सेवेची महती पोहोचणार याची खात्री आहे. या सर्व कामासोबतच छोटे छोटे फाऊंडेशन, संस्था मानवसेवा करीत आहेत. निःस्वार्थ टीम रक्तदानाच्या सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांच्या सेवेचे त्यांना पूरक संदर्भ सेवा देण्याचे काम करते आहे. आजवर त्यांनी शेकडो रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलनाचा विक्रम केलेला आहे.
यापैकी कुठल्याही संस्थेचा प्रवास सोपा नाही. या संस्थांच्या उभारणीमागे आणि आजचे त्यांचे रूप प्रकट होण्यामध्ये अनेक अदृश्य हात आहेत. श्री सुरेश राठी, डॉ. अनिल पटेल, डॉ. विजय कावलकर, प्रा. घनश्याम दरणे, प्रलय टिप्रमवार अशी नावे तर अनेक आहेत सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही. पण एक विधायक शक्ती व कार्य करणारे एकत्र आलेत तर काय होतं हे यवतमाळने दाखवून दिले. प्रशासनातील संवेदनशील अधिकारी नेहमीच यासाठी मदत करतात. मात्र सोबतच एक खंत आहे की, सर्वपक्षीय राजकीय धुरीण या सेवा कार्याला तितकेसे महत्वाचे मानत नाहीत. राजकीय नेत्यांनी संवेदनशीलता ठेऊन या सेवाकार्याला अधिक महत्व दिले तर सोन्याहून पिवळे. सर्व सेवाकार्य अधिक जोमाने पुढे जावे यासाठी येथील सामाजिक भान असणारे व्यवसायिक, अधिकारी, पत्रकार, संवेदनशील कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण करुन एक नैतिक शक्ती जिल्ह्यात भविष्यात उभी होणार हे नक्की.
विविध संस्थांच्या समाजकार्याला एका माळेत गुंफणारी ‘सेवासृष्टी’ची एक नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच यवतमाळमध्ये साकारत आहे. पाच एकर जागेमध्ये सामाजिक संस्था एकत्र येत आपापले प्रकल्प चालविणार, अशी ही नावन्यिपूर्ण संकल्पना येथे मूर्त रूप घेत आहे. एकाच जागी अनेक प्रकारच्या सेवा देण्याची संकल्पना सेवा समर्पण प्रतिष्ठानची स्थापना करून प्रशांत बनगिनवार, सुरेश राठी, अनंत कौलगीकर, दीपक बागडी, डॉ.आलोक गुप्ता धुरिणींनी राबविली आणि आता त्यांच्याच संकल्पनेतून ‘मानवसेवा धाम’ साकारत आहे. काही वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्यांच्या वेदनांनी विव्हळणारी यवतमाळची भूमी आता विविध सामाजिक संस्थांच्या मानवसेवेने सिंचित होत आहेत.
नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे झालेला हा बदल, सेवातपस्वी बाबा आमटे यांच्या ‘हाथ लगे निर्माण में, नहीं मांगने, नहीं मारने’ या ओळींचा प्रत्यय देणारा आहे. यवतमाळ जिल्ह्याचा बदलता सामाजिक चेहरा प्रचंड आश्वासक आणि ऊर्जादायी आहे, हा प्रत्यय येथील प्रत्येक संस्थेबरोबर काम करताना येतो. यवतमाळ ही उद्याची महाराष्ट्रातील मानवसेवेची पंढरी आहे, यात आता कुठलीही शंका नाही.
अनंत कौलगीकर. 9822640724.