कचऱ्याच्या झोपडीतून थेट ‘नंददीप’च्या आश्रयाला मनोरुग्णाची सुटका; झाडझुडपात एकटाच होता वास्तव्याला लग्नकार्यातील फेकलेल्या अन्नातून भागवायचा भूक

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
लग्नकार्यातील फेकलेल्या अन्नातून भागवायचा भूकमनोरुग्णांकडून नेमके काय घडेल याचा नेम नसतो.असाच एक मनोरुग्ण मागील दोन वर्षांपासून कचऱ्याच्या झोपडीत वास्तव्याला होता.शुक्रवारी रात्री नंददीपचे संचालक संदीप शिंदे यांनी अत्यंत शिताफीने त्याची तेथून सुटका करून त्याला आपल्या केंद्रात दाखल केले. नागपूर महामार्गावरील एका मॉल परिसरात लग्नकार्यातून फेकलेल्या अन्नावर तो आपली गुजराण करीत होता.
भ्रम आणि वस्तुस्थितीतले अंतर ज्यांना कळत नाही ती माणसे स्किझोफ्रेनिया या आजाराने बाधित असतात.त्यांच्या हातून आकलनापलीकडचे कृत्य होऊ शकते, असाच प्रत्यय या घटनेतून आला.शशीधर (केंद्राने दिलेले नाव) हा मागील दोन वर्षांपासून नागपूर महामार्गावरील मॉल परिसरातील झाडझुडपात वास्तव्याला होता. ऊन,पाऊस,थंडी आणि वादळ वाऱ्याची तमा न बाळगता केवळ मांडी घालता येईल एवढ्याच जागेत तो राहत होता. दरम्यान, १० जानेवारीला सायंकाळी चारच्या सुमारास नंददीपचे प्रदीप शिंदे यांना आलेल्या एका बेनामी फोनवरून त्याची माहिती मिळाली.त्यांनी याबाबत आपले बंधू नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना अवगत केले.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ज्येष्ठ पत्रकार आनंद कसंबे,मामा रमेश धावतोडे,मार्गदर्शक नरेंद्र पवार,केंद्राचे पुनर्वसन समन्वयक अमित कांबळे,कॅमेरामन प्रसाद काळे तसेच प्रभुजी सोनू मोरे यांच्यासह घटनास्थळ गाठले.दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर अखेर तो गवसला.शिंदे यांनी आपले कौशल्य पणाला लावून त्याला निवारा केंद्रात येण्यासाठी राजी केले.नंददीप येथे आता त्याच्यावर मानसोपचार सुरु झाले आहे. आजघडीला या केंद्रात ७२ पुरुष आणि ५७ महिला असे एकूण १२९ मनोरुग्ण उपचार घेत असून ५४५ मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात केंद्राला यश आले आहे.
मॉर्निंग वॉकर्सना शशीधरचे मानसिक आरोग्य दिसले नाही
मॉर्निंग वॉल्कला जाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे.यामधून आपले शारीरिक आरोग्य जपणाऱ्या बहुतांश वॉकर्सला शशीधरची माहिती होती.परंतु,आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच त्याचेही मानसिक आरोग्य जागेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे,असा विचार एकाही वॉकर्सच्या मनात आला नाही.यापैकी एकानेही त्याची माहिती पोलीस किंवा पालिका प्रशासनाला सांगण्याची माणुसकी दाखविली नाही.परंतु,नंददीप फाउंडेशनने बेघर अशा मानसिक रुग्णांच्या पुनर्वसनाचा विडा उचलल्याने ते या कार्याला आपली नैतिक जबाबदारी मानतात.
असा गवसला शशीधर
झाडझुडपांनी वेढलेल्या मॉल परिसराला नंददीपच्या सहकाऱ्यांनी पिंजून काढले.परंतु,तो आढळून आला नाही.परंतु,संचालक संदीप शिंदे यांना मात्र त्याची चाहूल लागली.त्याला साद घालताना शशीधरनेही प्रत्युत्तर दिले.मला दहा रुपये द्या,मला मावशी आणि भाऊ आहे.मी तुमच्यासोबत येत नाही,असे तो बोलत होता.दुर्गंधीने सरपटणारे जीव माझ्याजवळ येत नाही,अशी त्याची भन्नाट समजूत होती.मॉलच्या लगत असलेल्या मंगल कार्यालयातून फेकलेल्या अन्नावर तो आपले पोट भरायचा.यावर शिंदे यांनी मी तुला चांगले जेवण देतो,तू आमच्यासोबत चल असे म्हणताच तो केंद्रावर येण्यास तयार झाला.विशेष म्हणजे केवळ मांडी घालून बसता येईल,इतक्याच जागेत तो वास्तवाला होता.तो बसूनच झोपी जात असेल असा प्राथमिक अंदाज सहकाऱ्यांनी यावेळी वर्तविला.शशीधरच्या या घटनेतून ”पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या,या झोपडीत माझ्या॥ येता तरी सुखे या,जाता तरी सुखे जा,कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या हे वंदनीय तुकडोजींच्या भजनाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.