यवतमाळ येथे ९ फेब्रुवारीला लघुपट महोत्सवाचे आयोजन… आनंद कसंबे मित्रपरिवाराचा पुढाकार

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
सह्याद्री वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी, नामवंत छायाचित्रकार आणि हरहुन्नरी कलावंत आनंद कसंबे यांच्या पुरस्कार विजेत्या लघुपटांचे यवतमाळकरां साठी विशेष प्रदर्शन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी स्थानिक महेश भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
आनंद कसंबे यांनी आजवर अनेक माहितीपट, लघुपट आणि विविध विषयावरील वृत्तमालिका केलेल्या आहेत. यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण विषयक समाज हिताचे काम करणाऱ्या अनेक संस्थां वरील माहितीपट सुद्धा श्री. आनंद कसंबे यांनी तयार केले आहेत.
सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी केलेल्या अनेक लघुपटांना आजवर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गौरवल्या गेले आहे. यवतमाळकरांच्या दृष्टीने ही भूषणावह बाब असून या सर्व लघुपट आणि संस्था वरील माहितीपटांचा आस्वाद यवतमाळकरांना एकाच वेळी
घेता यावा या दृष्टीने रविवार दिनांक ९ फेब्रुवारी ला दुपारी ३,३० वाजता स्थानिक महेश भवन मध्ये कसंबे यांनी निर्माण केलेल्या निवडक लघुपट, माहिती पटांचे प्रदर्शन आनंद कसंबे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ई माध्यमांमधील नामवंत व्यक्तिमत्व मूळ यवतमाळकर आशिष जाधव, (लोकमत ई माध्यम, मुख्य संपादक) मुंबई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात भारत सरकार तर्फे नुकतीच पद्मश्री घोषित झालेल्या संशोधक शेतकरी श्री. सुभाष भाऊ शर्मा यांचा सत्कार सुद्धा केला जाणार आहे. पूर्णपणे निशुल्क असलेल्या या कार्यक्रमाला यवतमाळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.